मुंबई : महिला दिनाचं औचित्य साधून पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रथमच महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे. 8 मार्चपासून मुंबई-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन महिला टीसी म्हणून काम पाहतील.
नीरु वाधवा आणि राधा अय्यर या दोन महिला टीसी मुंबई-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लासमधील प्रवाशांचं तिकीट तपासतील. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चपासून त्यांची ही ड्युटी सुरु होईल. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर उपनगरी लोकल ट्रेन्सच्या महिला कम्पार्टमेंटमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवरच महिला टीसी होत्या.
तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येईल. तो यशस्वी ठरल्यास स्लीपर क्लास आणि जनरल डब्यातही महिला टीसींची नेमणूक करण्यात येईल. यासाठी 20 महिला टीसींची निवड करण्यात आली आहे. दीर्घ अनुभव हा निकष निवडीसाठी ठेवण्यात आला होता. ऑन फील्ड ट्रेनिंगच्या आधी त्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं.
ट्रेनिंग देण्यासाठी 20 महिला टीसींना नोव्हेंबरपासून चार महिने मुंबई-सुरत इंटरसिटीमध्ये पाठवण्यात आलं होतं. तीन बॅचमध्ये या महिलांनी प्रशिक्षण सुरु केलं. त्यावेळी प्रवासात महिला टीसींना कोणत्या समस्या येतील, हे लक्षात आल्यानंतर पश्चिम रेल्वेने त्या दूर केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.