नवी मुंबई: नवी मुंबईतल्या कोंबडभुजे इथं चोर समजून चक्क पोलिसांनाच मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यात सात पोलीस जखमी झाले असून दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी लोकांवर कारवाईसाठी मुंबई पोलिसांचं एक पथक काल रात्री याठिकाणी आलं होतं. संशय येऊ नये म्हणून या पथकानं पोलीस वेशात न येता साध्या वेशातच कोंबडभूजे या गावात प्रवेश केला.
यावेळी काही ग्रामस्थ पोलिसांना बघून चोर-चोर ओरडून त्यांच्या मागे त्यांना पकडण्यासाठी धावू लागले. गर्दी जमा झाल्यानंतर लोकांनीच काठी, बांबू आणि लाथा बुक्क्यांनी पोलिसांना मारहाण केली.
सध्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.