मुंबई : "हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. शिवाय ज्या बागायती जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्याच्या मोबदल्यात उत्तम जमीन देणार येईल," अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्याच्या खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात सुभाष देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी ही माहिती दिली.
हरकती असल्यात अधिग्रहण नाही
सुभाष देसाई म्हणाले की, "खंडाळा टप्पा क्रमांक एकमधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 15 टक्के परताव्याची जमीन, टप्पा दोनमध्ये दिली जाईल. टप्पा दोनमधील हरकती असलेल्या जमीन अधिग्रहित करणार नाही. अधिग्रहित बागायती जमिनीच्या मोबदल्यात उत्तर जमीन देण्यात येईल. टप्पा तीनमधील लाभ क्षेत्रातील जमीन वगळण्यात येईल."
आणखी नोकऱ्या देणार
"3 हजार 926 नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. 2 हजार 490 स्थानिकांना रोजगार देण्यात आले आहेत. आणखी नोकऱ्या उद्योग मंत्रालयाकडून देण्यात येतील. एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी गावांची पाहणी करुन बैठक घेतील. या प्रकरणाच्या विलंबासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी-जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी महसूल मंत्र्यांकडे करतो," असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.
या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. देसाईंच्या दालनात ही बैठक पार पडली. प्रमोद जाधव, रवी ढमाळ, युवराज ढमाळ, आनंदा ढमाळ, दत्ता हाके आणि सतीश कचरे अशी शिष्टमंडळात समावेश असलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. "प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाल्यामुळे त्यांनी जाताना माझे व्यक्तीश: आभार मानले आणि शासनाचं अभिनंदन केलं," असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन
शेतकरी किसान मंच या संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं होतं. हे शेतकरी अर्धनग्न अवस्थेत साताऱ्याच्या खंडाळ्याहून मुंबईत दाखल झाले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानुसार शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ पोलिसांच्या व्हॅनमधून आज मंत्रालयात दाखल झालं.
गेल्या 10 वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करत आहेत, मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं अस्त्र उपसलं होतं. खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपूर्वी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये त्यांना पोलिसांनी अडवलं. यावेळी मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वाहतूक कोंडीचं कारण दिलं होतं.
सातारा जिल्ह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळ्याहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले होते.
एबीपी माझाने सातत्याने या शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. त्यांच्या व्यथा, त्यांचा आक्रोश जनतेसमोर मांडला. त्यानंतर सरकारला जाग आली असून, उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी या शेतकऱ्यांना वेळ दिली. त्यानंतर शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
अर्धनग्न आंदोलक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज मंत्रालयावर धडकणार
खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन स्थगित
अर्धनग्न मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुंबईच्या वेशीवर अडवलं
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही : सुभाष देसाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2019 01:58 PM (IST)
शेतकरी किसान मंच या संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं होतं. हे शेतकरी अर्धनग्न अवस्थेत साताऱ्याच्या खंडाळ्याहून मुंबईत दाखल झाले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -