भाजपचं मिशन 2019, महाआघाडीविरोधात शक्तीप्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 21 Jan 2019 01:09 PM (IST)
देशभरात लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यांमध्ये होणार असल्या तरी भाजपशासित सर्व राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी प्रचार करण्याची भाजपने रणनीती आखली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपने शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय आधिवेशनानंतर आता प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रम राबवण्यासाठी संघटनात्मक नेमणुका सुरु करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात युतीचं भवितव्य अजून अधांतरी असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पुढच्या दीड महिन्यात स्वबळावर प्रचाराची नेट प्रॅक्टिस सुरु केली जाणार आहे. 2014 च्या निवडणुकीत हाय टेक प्रचार करुन आणि मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने देशात सत्ता आणली. मात्र 2019च्या निवडणुकीला सामोरे जाताना खालच्या कार्यकर्त्याला कामाला लावण्याची जोरदार तयारी भाजपने सुरु केली आहे भाजपची प्रचार रणनीती देशभरात लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यांमध्ये होणार असल्या तरी भाजपशासित सर्व राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी प्रचार करण्याची भाजपने रणनीती आखली आहे. यामुळे मोदींविरोधात एकजूट होत असलेल्या महाआघाडीला ताकदीने विरोध करता येणार आहे. तसंच प्रचारात सुसूत्रता, एकवाक्यता आणि मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणे शक्य होईल.