मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं शिवसैनिकांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. येत्या 23 जानेवारीला म्हणजेच बुधवारी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याच दिवशी महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.


23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीच्या दिवशी महापौर बंगल्याच्या जागेचा ताबा स्मारक समितीला मिळत असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख्य नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पुजनानं बाळासाहेबांच्या स्मारकाचा श्रीगणेशा होणार आहे.


बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर येतात. त्यामुळे महापौर बंगल्याच्या जागेवर होणाऱ्या गणेश पुजनाच्या कार्यक्रमाला अनेक शिवसैनिकही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. म्हणून बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे.