..तोपर्यंत परिचारकांना निलंबित करु : चंद्रकांत पाटील
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2017 02:55 PM (IST)
मुंबई: आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत दुमत नाही. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत,प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्यात येणार आहे. तशी शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात येईल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. राज्यभरात परिचारक यांच्या वक्तव्यावरुन राळ उठली आहे. याप्रकरणी सरकारनेही दखल घेतल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. "प्रशांत परिचारक यांच्यावरील कारवाईबाबत सात सदस्यांची सर्वपक्षीय समिती नेमण्याची विनंती सभागृहाला केली आहे. त्या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारकांना निलंबित केलं जाईल. परिचारकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यानंतर समिती जो निर्णय घेईल, तो सरकारला मान्य असेल. तो आम्ही सभागृहात मांडू. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी समितीचा अहवाल येईल. तोवर परिचारक यांना निलंबित करण्यात येईल. उद्याच विधानपरिषदेत तसा ठराव मांडू", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत दुमत नाही. आज सगळ्या गटनेत्यांची मुख्यमंत्री आणि सभापती यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. 7 सदस्यीय समिती तयार केली जाईल. समिती अहवाल देत नाही तोपर्यंत त्यांना सभागृहात बसण्याची अनुमती नसेल. निलंबनाचा निर्णय हा सभृहात घेण्याचा अधिकार आहे. विरोधकांनी प्रस्ताव मान्य केला तरच सात सदस्यीय समितीत कोण असेल हे ठरवता येईल, समितीचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. काय आहे प्रकरण? महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता. “पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.