मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि सभागृहाच्या आतही विरोधक आक्रमक झाले. 'उद्योगपती तुपाशी, शेतकरी उपाशी', 'मोदी दौऱ्यावर शेतकरी फासावर' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.


महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सरकारला कर्जमाफीवरुन सभागृहात धारेवर धरलं.

"चंद्रकांतदादा तुम्ही तर नंबर दोनचे मंत्री आहात. त्या पदाला अनुसरुन, उठा आणि जाहीर करा मी कर्जमाफी करतो म्हणून. तुम्ही हा निर्णय घेतल्यास आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. आम्ही सर्वजण तुम्हाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री करु", असं अजित पवार म्हणाले.



महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही?

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करु म्हणता, इथं तुमचं भाजपचं सरकार आहे, इथं का कर्जमाफी करत नाही? हा दुटप्पीपणा का? महाराष्ट्रात तुरीला भाव नाही, ऊसाचं वाटोळं झालंय. आम्ही कर्जमाफीची मागणी करतोय, तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ. पण शेतकरी वर गेल्यावर तुमची योग्य वेळ येणार आहे का? केवळ राष्ट्रवादीचीच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचीही शेतकरी कर्जमाफीची मागणी आहे.  150 पेक्षा जास्त आमदार ही मागणी करत असताना, सरकार शांत का, असा सवाल अजित पवार यांनी केला.

दरम्यान दिवाकर रावते पायऱ्यांवरून जात असताना कुठे गेले कुठे गेले, राजीनामे कुठे गेले. अशा घोषणा करत विरोधकांनी शिवसनेला डिवचलं.