Mumbai Water News: मान्सून लांबल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सद्यस्थितीत केवळ  6.97 टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी पुढील फक्त 26 दिवसांना पुरणारे असल्याने तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.


मुंबई आणि आसपासच्या भागात जरी पावसाला सुरुवात झाली असती तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात मिळून सद्यस्थितीत 6.97% पाणीसाठा शिल्लक आहे . त्यामुळे पुरेसा पाणीसाठा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेच्या जल विभागाने हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता त्याला काल मंजुरी मिळाली आहेच त्यामुळे एक जुलैपासून मुंबई दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे.


मुंबईला लागणारा पाणीपुरवठा विचारात घेता मुंबई महापालिकेला राज्य सरकारच्या राखीव पाणी साठ्यातून म्हणजेच भातसा धरणातला शिल्लक पाणीसाठा वापरता जरी येणार असला तरी राखीव शिल्लक पाणीसाठा आणि सात धरणातील पाणीसाठा मिळून एकूण 6.97% पाणीसाठा सध्या मुंबईसाठी शिल्लक आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात पाणीपुरवठा करताना यातील एक टक्के पाणीसाठा हा तीन दिवसासाठी पुरतो त्यामुळे जवळपास 26 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.


राज्यातील पाणीसाठ्यातही घट


 दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने चिंतेत आणखीच भर पडली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.  


सात तलावांतून वर्षभराचा पाणीपुरवठा 


मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी तलावात 14 लाख 47हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात लागोपाठ तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात लागोपाठ तिसऱ्या दिवशी म्हणजे कालही चांगला पाऊस झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत यंदा मान्सूनचं आगमन वीसेक दिवस उशिरानं झालं. पण उशिरानं दाखल झालेल्या पावसानं गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत संततधार कायम राखली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी, वैतरणा, भातसा, विहार, तानसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा या सातही धरणांच्या परिसरात गेल्या 24 तासांतही मुसळधार पाऊस झाला.