Vidyavihar Building Collapse :  संततधार पावसामुळे मुंबईत (Mumbai Rain) इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. विद्याविहारमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. 20  तासानंतर  ढिगाऱ्याखाली अडकलेल्या  दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र  उपचारादरम्यान त्यांचा  मृत्यू झाला आहे.  


मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात आहे. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाच्या   पहिल्या  दिवशी विद्याविहारमधील इमारत कोसळली आहे.  तब्बल 20 तास NDRF रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.  20 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर  काढण्यात यश आले. दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत .


विद्याविहार येथील तीन मजली प्रशांत निवास इमारत 


विद्याविहार येथील तीन मजली प्रशांत निवास इमारत रविवारी सकाळी खचली.  सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आले. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबापैकी अलका आणि नरेश पालंडे  यांना 20 तासानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात  आले . एनडीएआरएफ ने शर्तीचे प्रयत्न करुनही या दोघांना बाहेर काढले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विद्याविहार येथील ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


विले पार्ल्यात इमारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू


विले पार्ले परिसरातही इमारत कोसळली आहे. विले पार्ले येथे दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कपूर रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.  या दुर्देवी घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. 65 वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि 70 वर्षीय रोबी मिसाईटा या दोघांचा मृत्यू झालाय 


पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई 


मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलीय. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका महिलेला अशाच प्रकारे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. काही चार चाकी वाहनांच्या टायरच्या लेव्हलपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळालं. दरम्यान पावसाचं स्वागत करा... बदनाम करु नका असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.