Mumbai Vaccination : देशासह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत असून यापार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीमेनं वेग धरला आहे. परंतु, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिनांक 9 जुलै, 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शुक्रवार) दिनांक 9 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य तो निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. त्याचप्रमाणे लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. यासंदर्भातील योग्य ती माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जाईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतं. हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही 16 जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणारा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम काही प्रमाणात मंदावल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील कोरोना स्थिती
मुंबईत कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत गेल्या 24 तासांत 540 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 628 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 7714 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबई शहराचा दर दुपटीचा कालावधी हा 858 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. अशातच मुंबईत आतापर्यंत 701195 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.