Mumbai Vaccination : देशात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहीमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (गुरुवार) दिनांक 19 ऑगस्ट, 2021 आणि उद्या (शुक्रवार) दिनांक, 20 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
"मुंबईकरांनो, दिनांक 19 व 20 ऑगस्ट, 2021 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यावर 21 ऑगस्ट रोजी लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.", अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त झाल्यावर 21 ऑगस्टपासून लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असंही महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मुंबईकरांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतं. हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही 16 जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,686 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2057 दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील निर्बंधांमध्येही सूट देण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी लसीकरणाची अट ठेवण्यात आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच अनेक बाबींमध्ये सूट दिली गेली आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील, अशा नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, केवळ लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळते. अशातच लसींच्या पुरवठ्याअभवी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ येत असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणातील दिरंगाई महागात पडू शकते, असंही बोललं जात आहे.