Mumbai University Hostel Naming Issue : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला नामकरण वाद चिघळण्याची शक्यता आहे. या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव द्या असा राज्यपालांच्या सूचना आहेत तर वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी छात्रभारतीनं केली आहे. 8 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं.


या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे अशा सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केल्या आहेत. वीर सावरकर यांना देखील कुलगुरुंनी कुठे स्थान द्यावं. जे होस्टेल बनत आहे त्याला सावरकर यांचे नाव द्यावे, असं राज्यपालांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात म्हटलं होतं. मात्र दुसरीकडे या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता छात्रभारतीने लावून धरली आहे यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंना पत्रव्यवहार केला आहे. शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष आणि त्यांचे कार्य आणि विचार लक्षात घेता वस्तीगृहला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावं अशी मागणी पत्रात केली आहे. त्यामुळे वसतिगृहाला नाव देताना नाव नेमकं कोणतं द्यायचं? असा पेच विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरुंसमोर उभा राहिला आहे.


भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले

मुंबई विद्यापीठाच्या चार इमारतींचे उद्घाटन आठ जुलै रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमात राज्यपालांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नामकरण 'वीर सावरकर' करावे, अशी सूचना आपल्या भाषणात कुलगुरूंना केली. ही सूचना राज्यपालांनी केल्यानंतर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने तातडीने कुलगुरूंना पत्र लिहून या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नाव 'छत्रपती शाहू महाराज' द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या वसतीगृहाचे नामकरण करताना विद्यापीठ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज भवन, ज्ञान स्रोत केंद्र, मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचं उद्घाटन केलं. या उद्घाटन कार्यक्रमात बोलत असताना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचे कार्य महान आहे, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदराचे स्थान देत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला नाव वीर सावरकरांचं द्यावं अशी सूचना राज्यपालांनी भाषणावेळी केली. जेणेकरून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहात जे विद्यार्थी शिक्षणासाठी येतील त्यांना सावरकर यांच्या कार्याबद्दल त्यासोबतच भारताच्या इतिहासाबद्दल माहिती होईल, असं मत राज्यपालांनी यावेळी मांडले.

 

मात्र, राज्यपालांनी सूचना करताच छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नाव 'छत्रपती शाहू महाराज' करावे अशी मागणी पत्र कुलगुरूंना पाठवलं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुरुवात केली. त्यांनी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांचे कार्य आणि विचार लक्षात घेता त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. या वसतिगृहाला नाव देताना आम्हाला कुठल्याही नावाला विरोध नाही. मात्र आम्ही सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांनी वेळोवेळी हे वसतिगृह व्हावे यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचे विचार व कार्य बघता त्यांचं नाव या वसतिगृहाला असावे, अशी आमची मागणी आम्ही कुलगुरू पुढे मांडली आहे' असे छात्रभारती  राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी 'एबीपी माझा' शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता वसतिगृहाचा नामकरण करताना नेमका काय निर्णय विद्यापीठ प्रशासन घेतं हे बघावे लागेल