मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर आले असल्याच्या आरोपावर मुंबई विद्यापीठाने खुलासा केला आहे. ते झेरॉक्स सेंटर हे विद्यापीठाच्या आवारातील आणि विद्यापीठाच्या मालकीचे असून नियमित कामासाठी त्या ठिकाणी झेरॉक्स काढले जात असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. 


आरोपांवर काय म्हणाले विद्यापीठ?


आयडॉलचा परीक्षा विभाग पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा घेत असतो व त्याचे निकाल जाहीर करत असतो. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016 अन्वये निकाल जाहीर केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रतीची मागणी केलेली असते. त्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देणे हे बंधनकारक आहे. यासाठी आयडॉलच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर स्वतंत्र झेरॉक्स केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. 


तेथे 24 तास मुंबई विद्यापीठाचे सुरक्षारक्षक तैनात आहेत व ही जागा सी सी टी.व्ही च्या नियंत्रणात आहे. सदरचे झेरॉक्स केंद्र हे आयडॉलच्या इमारतीत असून ते सार्वजनिक नाही. आयडॉलच्या स्टाफला व विद्यार्थ्यांना झेरॉक्स काढण्यासाठी सदरचे झेरॉक्स केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.


युवासेनेचा आरोप काय होता?


विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर (Mumbai University Answersheet Found At Xerox Centre) सापडल्या असल्याचा आरोप युवा सेनेने (Yuva Sena) केला होता. या प्रकरणाचा तपास करून परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणीही केली. यापूर्वीही विद्यापीठातील उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले होते. आता त्यानंतर उत्तरपत्रिका बाहेरच्या झेरॉक्स सेंटरवर सापडल्याचा आरोप केला जात आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गलथान कारभार सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.  दुरस्थ व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर सापडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यापीठाचा परीक्षा विभाग अत्यंत गोपनीय समजला जातो, मात्र याच विभागातील उत्तर पत्रिका बाहेर कशा काय आल्या असा सवाल युवा सेनेने केला आहे. 


कुलगुरू आणि प्र. कुलगुरू यांनी लक्ष देऊन हे गैरप्रकार थांबवत आयडॉलच्या परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने केली होती. त्यावर आता विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलं आहे. 


ही बातमी वाचा: