मुंबई:  मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर (Mumbai University Senate Election) गुरुवारी प्रशासनाने अचानकपणे स्थगिती दिल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबई विद्यापीठाने (University Of Mumbai) घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास सगळ्याच विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या. आज ठाकरे गट युवा सेना, छात्र भारती, सम्यक विद्यार्थी संघटना, मनविसे आदी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. विद्यापीठाने अचानक निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता, मुंबई विद्यापीठाने निवेदन जारी करत सिनेट निवडणुकीला स्थगिती का दिली, याची माहिती दिली आहे. 


मुंबई विद्यापीठाने काय म्हटले?


मुंबई विद्यापीठाचे पत्र काढून या सर्व सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (न) मधील तरतूदीनुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधर निवडून देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सर्व संबंधिताना कळविण्यात आले होते. दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी (सुधारीत) प्रसिद्ध करण्यात आली होता. दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठास अंतिम मतदार यादी (सुधारीत) यामध्ये काही विसंगती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले. 


सदर विसंगतीची तात्काळ सखोल चौकशी करून त्याच दिवशी अहवाल सादर करण्यास कळविले व त्या अनुषंगाने विद्यापीठाने मतदार यादीतील मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही, तसेच याबाबत योग्य ती सखोल चौकशी करण्याकरीता विद्यापीठास वेळ आवश्यक असल्याने शासनाने विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली. 


त्याअनुषंगाने शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होऊनच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक असल्याने मतदार यादी सुधारीत करून निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश दिले. 


या निर्देशाच्या अनुषंगाने विद्यापीठाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रक निर्गमित केले. पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत वेळोवेळी विद्यापीठ निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले. 


मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. 9 ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. 10  सप्टेंबरला निवडणूक आणि 13 सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता.


भाजपचे आशीष शेलार यांचे मतदार यादीवरून प्रश्न 


दरम्यान, सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तसे त्यांनी एक पत्र राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: