लोकमान्य टिळक टर्मिनस इथे 2 मार्च रोजी एका व्यक्तीला बिस्कीट खाण्यास दिल्यानंतर, त्याचं साहित्य घेऊन या आरोपींनी पोबारा केला होता. या इसमाने याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे केली होती. रेल्वे सुरक्षा बल सीसीटीव्ही कॅमेरा आणि गस्ती घालून आरोपींचा शोध घेत होते. 8 मार्च रोजी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना एक संशयित लोकमान्य टिळक टर्मिनसच्या हॉलमध्ये फिरताना दिसला. पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
आरोपी नशेच्या गोळीची पावडर करुन ती क्रीमच्या बिस्कीटमध्ये भरत असत. एखाद्या प्रवाशासोबत ओळख करुन त्याला ही बिस्कीटं खाण्यास देत. प्रवाशाला गुंगी आली की त्याला लुटून पळ काढत असत. अखेर पोलिसांनी काल या मामा-भाच्याच्या टोळीला जेरबंद केलं.