मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री (12 मार्च) उशिरा 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार असल्यावरही शिक्कामोर्तब झालं.

युती झाल्यानंतर शिवसेना 23 तर भाजप 25 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं याआधीच जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे कुठे कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. यावेळी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

विशेष म्हणजे आजच्या या बैठकीत लोकसभेचं जागावाटप किंवा वाटाघाटींवर कुठलीही चर्चा झालेली नाही, तर उलट खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबई, रावसाहेब दानवे यांची जालना आणि पालघर या जागांबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असेल.



या बैठकीनंतर मुख्यमंत्री मीडियाशी न बोलताच सरळ निघून गेले. मात्र या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र एकाच व्यासपीठावर प्रचारासाठी येणार असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं 'एबीपी माझा'ला सूत्रांनी सांगितलं.

प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नसताना युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरला. युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भव्य सभा होणार आहे.

24 मार्चला कोल्हापुरात होणार शिवसेना-भाजप युतीची एकत्रित सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, पुण्यातील प्रचार मेळाव्यावरही एकमत झाल्याची माहिती आहे.


सहा प्रचार मेळाव्यांच्या शेड्युलवर एकमत


15 मार्च : 

दुपारी - अमरावती

संध्याकाळी - नागपूर


17 मार्च :

दुपारी - औरंगाबाद

संध्याकाळी - नाशिक


18 मार्च :

दुपारी - नवी मुंबई

संध्याकाळी - पुणे


राज्यभरात स्टार कॅम्पेनर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभा  होणार असल्याचं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलं.

सुजय विखे 'मातोश्री'वर

भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेची साथ मिळावी यासाठी सुजय सेनेला विनंती करणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता 'मातोश्री'वर जाऊन सुजय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत.
संबंधित बातम्या :

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना महामंडळांच्या सदस्यपदांची खैरात

काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश

पार्थ, सुजयनंतर आता आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात?