मुंबईतील मराठा मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि कोकणातून येणाऱ्या वाहनांमुळे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबईत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर येणाऱ्या स्थानकांच्या बाहेर पार्किंग करून मोर्चेकऱ्यांना रेल्वेने मुंबईत जावं लागेल.
वाहनाने मुंबईला आल्यास वाहन नवी मुंबईतील स्टेशनांबाहेर पार्क करावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं स्थानक देण्यात आलेलं आहे. त्यानुसार वाहन पार्क करुन मोर्चाच्या ठिकाणी यावं लागेल.
जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था
- सातारा, सांगली, कोल्हापूर - वाशी एपीएमसी मार्केट
- पुणे , सोलापूर - खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान
- अहमदनगर - खांदेश्वर रेल्वे स्थानक
- औरंगाबाद – मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानक
- रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग - नेरुळ , सीवूड्स रेल्वे स्थानक, तांडेल मैदान
- बीड - सानपाडा रेल्वे स्थानक, दत्त मैदान
- परभणी जिल्हा - वाशी रेल्वे स्थानक, महाराष्ट्र सदन
उदाहरणार्थ,
औरंगाबाद जिल्ह्यातून आलात तर तुम्हाला मानसरोवर (कामोठे) स्टेशनला वाहन पार्क करावं लागेल. पनवेल-खांदेश्वर आणि त्यानंतर कामोठे म्हणजे मानसरोवर स्टेशन आहे. मानसरोवर स्टेशन हे सायन-पनवेल हायवेपासून काही अंतरावर आत आहे. त्यामुळे कळंबोली मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे पूल म्हणजेच कळंबोली सर्कलपासून पुढे आल्यानंतर कामोठे पुलाखालून स्टेशनच्या दिशेने जावं लागेल. स्टेशनच्या पार्किंगमध्ये वाहनं लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मानसरोवर स्टेशनला वाहनं लावल्यानंतर मोर्चेकऱ्यांना भायखळ्याला जावं लागेल. त्यासाठी मानसरोवर स्टेशनवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हार्बर लाईनच्या ट्रेनची व्यवस्था असेल. मानसरोवर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मुंबईला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणाऱ्या लोकल ट्रेन मिळतील.
सीएसएमटीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुर्ला हा भायखळा स्टेशनला जाण्यासाठी थेट पर्याय आहे. कुर्ल्यात उतरुन मध्य रेल्वेने (सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन) भायखळ्याला जाता येईल. भायखळा स्टेशनच्या बाहेरच वीर जिजामाता उद्यान आहे, जिथून मोर्चाला सुरुवात होईल.
कुर्ला हे मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या स्टेशनपैकी एक आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मुंबईत आलेल्यांची कुर्ल्यात गैरसोयही होऊ शकते. त्यामुळे कुर्ल्यात न उतरता हार्बर लाईनवरच वडाळा, शिवडी, कॉटन ग्रीन, रे रोड हे स्टेशन भायखळ्यापासून जवळ असणारे स्टेशन आहेत. यापैकी एखाद्या स्टेशनला उतरल्यास तुम्हाला टॅक्सीने मोर्चाच्या ठिकाणी जावं लागेल.
उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी पर्याय
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातूनही मोर्चासाठी मुंबईत अनेक मराठा बांधव येणार आहेत. अहमदनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी मुरबाड येथे महामार्गालगत, कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज मैदानात आणि डोंबिवलीत संत सावळाराम महाराज क्रीडा संकूल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी शहापूर येथे महामार्गालगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे शहरात आनंदनगर जकात नाका येथील मैदानात मध्यवर्ती पार्किंग उभारण्यात आलं असून तिथे नाश्ता आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातून आल्यानंतर भायखळ्याला ट्रेनने जाण्यासाठी मध्य रेल्वेने जावं लागेल. कल्याण, ठाणे या स्थानाकातून मध्य रेल्वेने जाता येईल. भायखळा स्टेशनला उतरल्यानंतर जवळच वीर जिजामात उद्यान आहे.
संबंधित बातम्या :