मुंबई: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ई-चलानद्वारे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही दंड भरला जात नसल्याचं चित्र आहे. परिणामी दंडाच्या थकबाकीचा आकडा वाढत असून 20 हजार आणि त्यापेक्षा अधिक प्रलंबित असलेला दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिस आता थकबाकीदार वाहन मालकांच्या घरी नोटीस पाठवणार आहेत. ही नोटीस वाहन चालकांना गणपतीनंतर देण्यात येणार आहे. त्यानंतर जो कोणी 15 दिवसात दंड भरणार नाही त्याच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू केला जाणार आहे.
मुंबई शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 34.61 लाख चालकांविरोधात कारवाई करत 247.82 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये दंड वाहन चालकांनी भरलेले आहेत. तर उर्वरित 171 कोटी रुपायंचा दंड भरण्यासाठी वाहन चालकांना गणपतीपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीपर्यंत दंड भरण्यात आला नाही तर पुढे पोलीस प्रत्येक वाहन धारकाला नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात जाईल. त्यामुळे आपल्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणताही दंड असल्यास तो त्वरित भरा, अन्यथा कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील.
यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस जागेवरच रोख रक्कम स्वीकारून दंड आकारत होते. मात्र ते करताना पोलिसांकडून तडजोड व्हायची. तसेच पोलिसांबरोबर खटके उडायचे. असे प्रकार रोखण्यासाठी 2016 पासून ई-चलन प्रणाली लागून करण्यात आली होती. ई- चलन यंत्राद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर दंड आकारला जातो. हा दंड संबंधित वाहनावर जमा होतो. वाहतूक पोलिसांच्या महाट्रॅफिक या ॲपवर जाऊन तो 14 दिवसांच्या आत ऑनलाईन भरायचा असतो. मात्र वाहन चालक दंड भरण्यास टाळाटाळ करत करत आहेत.
मुंबईत वाहनचालकांकडून कोणकोणत्या वाहतुकीचे उल्लंघन केले जाते?
• नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग.
• हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवणे.
• सीट बेल्ट न लावता कार चालवणे.
• अतिवेगाने वाहन चालवणे.
• सिग्नल जंपिंग.
• वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने.
• दारू पिऊन गाडी चालवणे व इतर .
- वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली कारवाई केली जाते.
- केवळ मुंबईच नाही तर इतर उपनगरांमध्येही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावे लागणारे कोटींचे आकडे आहेत.
- ठाणे (46 कोटी 49 लाख 43 हजार 50 रुपये),
- वसई विरार ( 1 कोटी 41 लाख 4 हजार 950)
- मीरा भाईंदर (1 कोटी 18 लाख 73 हजार 400) आणि
- पालघर (33 लाख 35 हजार 400).
एवढ्या मोठ्या रकमेचा दंड वसूल करण्याचे आव्हान आता वाहतूक पोलिसांपुढे आहे. वाहनचालकांना 14 दिवसांची मुदत असते. परंतु तरी मुदतीत दंड भरत नाहीत. यासाठी दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन केले जाते. यात दंड असलेल्या वाहनचालकांना बोलावून तडजोड करून दंडाची रक्कम भरण्यास सांगितले जाते. त्यातही कुणी दंड भरला नाही तर त्यांच्यावर खटले दाखल करता येतात.
वाहतूक पोलीस दंड वसुलीसाठी आरटीओ परिवहन आयुक्तांशीही समन्वय साधत आहेत. जर कोणत्याही वाहनचालकाने त्याच्या वाहनांवर दंड केला असेल आणि तो वाहनाची फिटनेस, नाव हस्तांतरण यासारख्या कामासाठी आला असेल तर त्या वाहन चालकाकडून वसुली करणे आवश्यक आहे. ही कारवाई करण्यासाठी वाहतूक अधिकारी आरटीओ कार्यालयात तैनात असतील. त्याचबरोबर गणपतीनंतर वाहतूक पोलीस रस्त्यावरसुद्धा दंड वसुलीचे काम करणार आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर रक्कम भरावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असं आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे. नियमांचे पालन करा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.