Mumbai Torres Jewellers Scam : मुंबईच्या दादर येथील टोरेस कंपनीचा शेकडो कोटींचा घोटाळा केल्यानंतर यात काही लाख गुंतवणूकदार नागरिक आता गुंवलेल्या पैशांसाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी आपली जमापूंजी दाम दुप्पट किंवा झटपट श्रीमंतीच्या नादात या कंपनीत गुंतवली होती. मात्र आता हक्कांच्या पैशांसाठी वणवण फिरायची वेळ या गुंतवणूकदांरावर आली आहे. मुंबईतली ही काही पहिली घटना नाही. या आधीही क्यूनेट, बिटकॉईन, पर्ल्स गोल्ड फॉरेस्ट लिमिटेड कंपनी, शारदा चिटफंड घोटाळा यारख्या असंख्य घोटाळे होऊनही २१ व्या शतकात नागरिक अजूनही सजक झालेले नाहीत. टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर तरी नागरिकांचे डोळे उडतील हिच अपेक्षा.


मुंबईत दर पंधरा दिवसाला अशा अनेक गुन्ह्यांची नोंद विविध पोलिस ठाण्यात असते. यात प्रामुख्याने जास्त परतावा किंवा व्याजाची जादा रक्कम देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे स्वीकारले जातात. कालांतराने पितळ उघडं पडतं आणि नागरिक डोक्याला हात लावतात. अगदी लाखांपासून ते कोट्यावधी रुपयांपर्यंत ही गुंतवणूक असते. 


टोरेस कंपनीनेही 4 हजारपासून गुंतवणूक सुरू केली होती. आकर्षक परतावाच्या नावाखाली आणि आणखी लोकांना या स्किममध्ये जोडण्यासाठी विशेष परतवा दिला जायचा. या टोरेसमध्ये पालिका कर्मचारी, पोलिस, डॉक्टर, व्यापारी, निवृत्त कर्मचारी आणि गृहिणी यांनी लाखोंच्या संख्येने पैसे गुंतवले आहेत. दादरच्या भाजी मंडईतील 50 टक्क व्यापाऱ्यांनी या टोरेसमध्ये पैसे गुंतवले आहेत. दादरचे भाजी व्यापारी प्रदीपकुमार वैश्य यांनी तर 14 कोटी रुपये गुंतवले आहेत. 


टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी एक अॅप लॉन्च केलं होतं. टोरेसं नावाचं या अॅपवर नागरिकांना आपली खासगी माहिती भरून घ्यायचे, यात नाव, पत्ता, मोबाइलनंबर टाकून घ्यायचे. त्यानंतर किती गुंतवणूक केली किती परतावा मिळणार आणि कुठल्या तारखेला मिळणार याची माहिती दिली जायची. त्याबरोबर नवनवीन स्किमबाबत माहिती दिली जायची. तर यात ग्रुप बनवणाऱ्यांना विशेष भेटवस्तू किंवा आकर्षक परतावा दिला जाणार असे सांगितले जायचे. 


गोरेगावच्या आस्मा शेख यांनी या टोरेसमध्ये स्वत:सह 86 लोकांचे पैसे कंपनीच्या ऐकीव माहितीच्या आधारे गुंतवले आणि आज त्यांना 40 ते 50 लाखांचा भूर्दंड लागला. आपल्यासोबत घडलेल्या फसवणुकीबाबत सांगताना आस्मा सय्यद यांना अश्रू अनावर झाले.


टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 1500 हून अधिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी संपर्क केला आहे. आज EOW च्या पथकाने दादरच्या टोरेस कंपनीचा पंचनामा केला असून कंपनीच्या दादर कार्यालयातून कोट्यावधीची रोकड, भेट वस्तू, वावचर या कारवाई दरम्यान जप्त केले आहेत. तर टोरेसच्या दादर कार्यालयाची बॅकेतील 3 खाती फ्रिज केली असून त्यात 11 कोटींची रोकड असल्याचे तपासात समोर आले आहे.


या आधी अशाच प्रकारे घडलेल्या घोटाळ्यांवर आपण एक नजर टाकूया,


कोलकत्तातील शारदा चिटफंड घोटाळा / 17 लाख गुंतवणूकदार / 2460 कोटींची फसवणूक


क्यूनेट घोटाळा / फसवणूकीची रक्कम 425 कोटी


पर्ल्स चिटफंड घोटाळा / 5 लाख गुंतवणूकदर घोटाळ्याची रक्कम 45 हजार कोटी


बिट कॉईन घोटाळा / 235 कोटींचा घोटाळा


रॉयल ट्विंकल स्टार क्लब घोटाळा/ 15 हजार गुंतवणूकदार / 4500 कोटींचा घोटाळा


शेरेगर घोटाळा / 60 हजार गुंतवणूकदार / 100 हून अधिक लोकांची फसवणूक


या सारख्या मागच्या 5 ते 10 वर्षात अनेक घोटाळेबाज कंपन्यांनी दाम दुप्पटच्या नावाखाली नागरिकांना पैसे गुंतवण्यास भाग पाजून त्यांची फसवणूक केल्याची कितीतरी उदाहरणं आहे. मात्र तरीही बाजारात टोरेस कंपनीसारखी एखादी कंपनी आली तिने काही आमीष दाखवली की त्याला लोकं बळी पडतात. टोरेस घोटाळ्यात अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित लोकांनीच सर्वाधिक गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी अशा घोटाळबाज कंपन्यांपासून सावधान व सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


ही बातमी वाचा: