Mumbai Torres Jewellers Scam : टोरेस पॉन्झी घोटाळ्याची शिवाजी पार्क पोलिसांना 6 महिन्यांपूर्वी माहिती होती. पण त्यामध्ये कोणतीही कारवाई न केल्याने आता पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांची चौकशी करण्यात येणार असून एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे.


मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शिवाजी पार्क पोलिस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, हा तपास एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वीच टोरेस घोटाळ्याची माहिती असतानाही पोलिसांनी ठोस पावले का उचलली गेली नाहीत याची चौकशी आता केली जाणार आहे. 


शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या संशयास्पद माहितीवरून मुंबई पोलिसांनी कारवाई केली असती तर सहा महिन्यांपूर्वी टोरेस घोटाळा थांबवता आला असता, असे सूत्रांनी सांगितले. मात्र तसे न झाल्याने सहा महिन्यांत आणखी हजारो लोकांची फसवणूक झाली.


गेल्या वर्षीच घोटाळ्याची माहिती होती


टोरेस कंपनीशी संबंधित घोटाळ्याच्या शक्यतेची माहिती गेल्या वर्षी जून महिन्यातच शिवाजी पार्क पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ऑक्टोबरमध्ये या प्रकरणी संशय व्यक्त केला होता.


नोटीस बजावली मात्र पुढे काहीच झाले नाही 


शिवाजी पार्क पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विनय माने यांनी 29 जून 2024 रोजी टोरेस कंपनीच्या संचालकांना नोटीस बजावून फर्मच्या कामकाजाची आणि व्यवसायाची माहिती देण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी माने या परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या.  त्याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी नोटीस बजावून कंपनीचा तपशील मागवला. मात्र त्यापलीकडे काहीही झाले नाही.


नवी मुंबई पोलिसांनीही 24 ऑक्टोबरला कंपनीला नोटीस बजावली होती. त्यानंतर 14 नोव्हेंबरला आयकर विभागाने नोटीस बजावली होती.


यंत्रणांच्या या अपयशामुळे कंपनीला नोटीस बजावूनही कोणतीही मोठी कारवाई झाली नाही. त्यामुळे या कथित घोटाळा बिनदिक्कतपणे वाढच देसा आणि  विदेशी नागरिक पळून जाण्यात यशस्वी झाले.


टोरेस घोटाळ्याचा रिपोर्ट समोर


मुंबईतील टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंबंधीचा एक्सक्लुझिव रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती आला आहे. टोरेसचा माजी सीईओ तौसिफ रियाजचा 182 पानांचा रिपोर्ट आता समोर आला आहे. घोटाळा मीच समोर आणला असा दावा तौसिफ रियाजनं केलाय. टोरेस कंपनीचा घोटाळा 1 हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे.


दरम्यान, टोरेस घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरु केला असून घोटाळ्याचा आरोप असलेल्यांच्या कुलाबा, डोंबिवली, उमरखाडी  तसंच मुंबईतील टोरेसच्या तीन कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाई दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने अडीच ते तीन कोटी रोख रक्कम जप्त केली. तर या कारवाई दरम्यान कार्यालयात आणि आरोपींच्या घरी  पोलिसांना अनेक पासपोर्ट सापडले आहेत.


ही बातमी वाचा: