मुंबई : "राजीनामा देणं ही तारिक अन्वर यांची इच्छा आहे. पण त्यांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला तो चुकीचा आहे. अन्वर यांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा आहे. प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, पण याचा अर्थ पक्ष संपत नाही" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसंच अन्वर यांनी लोकसभा खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. राफेल डीलवरुन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याने नाराज झाल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
अन्वर यांनी पवारांना विचारायला हवं होतं!
याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "तारिक अन्वर यांनी शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे आहे. त्यांनी शरद पवारांना फोन करुन विचारायलं हवं होतं की, तुमचं म्हणणं काय आहे. आम्हाला/पक्षाला न विचारता त्यांनी हे पाऊल उचललं आहे, जे चुकीचं आहे."
तारिक अन्वरांशी बोलण्याचा प्रयत्न करु!
तारिक अन्वर यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी झटका समजला जात आहे. राष्ट्रवादी अन्वर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार का?, या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "आम्ही तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु. लोकसभेच्या खासदारकीच्या राजीनाम्याचा प्रश्न अध्यक्षांकडे असतो. पवारांना दिला असता तर आम्ही वेगळा विचार केला असता."
पवार काय म्हणाले होते?
“राफेल डीलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशावर लोकांना संशय आहे, असं मला वाटत नाही. विमानाशी संबंधित तांत्रिक माहिती सार्वजनिक करण्याच्या विरोधकांच्या मागणीत काही अर्थ नाही,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र विमानांच्या किंमतीची माहिती जाहीर करण्यात कोणतंही नुकसान नसल्याचंही ते म्हणाले होते. महत्त्वाचं म्हणजे यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ट्वीट करुन शरद पवारांचे आभार मानले होते.
पवारांची मोदींना क्लिन चिट नाही : राष्ट्रवादी
मात्र शरद पवारांनी राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लिन चिट दिलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. केंद्र सरकारने विमानांच्या किंमतीचा खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य
तारिक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी 1999 मध्ये शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. दिवंगत पीए संगमा, शरद पवार आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
तारिक अन्वर काँग्रेसमध्ये जाणार?
तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसचा हात धरणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि काँग्रेस सातत्याने बिहारमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत जर तारिक अन्वर काँग्रेसमध्ये सामील झाले तर राजकीयदृष्ट्या काँग्रेसला फायदा होऊ शकतो.
प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, याचा अर्थ पक्ष संपत नाही : पटेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2018 01:19 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसंच अन्वर यांनी लोकसभा खासदारकीचाही राजीनामा दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -