भिवंडी: भिवंडी शहरातील एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर गुजरातहून चेंबूरकडे निघालेला तब्बल 120 फूट बॉयलर अडकला. हा भलामोठा बॉयलर भारत पेट्रोलियमचा आहे. त्यामुळे भिवंडीत मोठी वाहतूक कोंडी झाली. शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

भिवंडी शहरात वाहतुकीची समस्या आधीपासूनच आहे. त्यात आज सकाळच्या सुमारास एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर गुजरातवरुन निघालेल्या 120 फूट बॉयलर उड्डाणपुलावर वळण न बसल्याने अडकून पडला. त्यामुळे  शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांना धाव घ्यावी लागली.

त्यांच्याकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या 120 फुटी अडकून पडलेल्या बॉयलरला काढण्यासाठी भिवंडी महानगरपालिकाकडे कोणतेही उपक्रम नव्हते. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून हा बॉयलर तेथेच अडकून पडला होता. त्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास या बॉलरला काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने पुलावरील इलेक्ट्रिक पोल काढून, या ट्रेलरला बाहेर हायवेच्या दिशेने वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सध्या वाहतूक पोलिसांकडून  पुलावरील वाहतूक बंद केली, असून पुलाखालील वाहतूक कोंडी सोडवले जात आहे.