मुंबई : 26/11 हल्ल्याची साक्षीदार आणि 114 वर्ष जुनी 'ताज महाल पॅलेस' या इमारतीला अधिकृतरित्या ट्रेडमार्क मिळाला आहे. मुंबईच्या वैभवांपैकी एक असणारी ही इमारत आहे. न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचं आयफेल टॉवर, सिडसीचं ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या जगातल्या अन्य प्रसिद्ध वास्तू आहेत. ट्रेडमार्क लाभलेली ताज महाल पॅलेस हॉटेलची इमारत भारतातली एकमेव आहे.


सर्वसाधारणपणे लोगो, ब्रँडची नावे, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी आणि अगदी आवाजांचेही ट्रेडमार्क होतात. पण एखाद्या वास्तूरचनेची ट्रेडमार्कसाठी नोंद होण्याची घटना ट्रेडमार्क कायदा (1999) आल्यापासून पहिल्यांदाच घडली आहे.

गेट वे ऑफ इंडियाच्याही आधी म्हणजे 1903 मध्ये ताज महाल पॅलेसची निर्मिती झाली. भारतीय नौदल तेव्हा बंदराचा मार्ग दाखवण्यासाठी या इमारतीच्या त्रिकोणी पॉईंटचा वापर करण्यात येत होता. तत्कालिन इंडियन हॉटेल्स कंपनी लि. चे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कौटुंबिक कंपनी शापूरजी पालनजी अँड कंपनीने ही इमारत तयार केली.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी या इमारतीचं रुपांतर रुग्णालयात करण्यात आलं होतं.

दरम्यान, ट्रेडमार्क मिळाल्यानं यापुढे कोणालाही ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या छायाचित्राचा व्यावसायिक वापर करता येणार नाही. तसा तो करायचा झाल्यास कंपनीला परवाना शुल्क द्यावे लागणार आहे.

सध्या अनेक स्टोर्स ताजमहालचे छायाचित्र असलेल्या फोटो फ्रेम्स, कफलिंक्सची विक्री करतात. शिवाय, एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या फोटोचा वापर बियरच्या लोगोत केल्यामुळे न्यूयॉर्कच्या एका रहिवाशाला अलिकडेच म्पायर स्टेट बिल्डिंगने कोर्टात खेचलं होते. त्यामुळे ताजचा फोटो व्यवसायिक कारणांसाठी वापरल्यास, त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.