काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांची अश्लील मेसेज आल्याची तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 11:06 AM (IST)
मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या शायना एन सी यांच्यानंतर आता काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनीही आपल्याला अश्लील मेसेज आल्याचा आरोप केला आहे. वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निवडणूक काळात हे मेसेज पाठवण्यात आल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं कृत्य नाही, असं सांगत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी गायकवाड यांनी केला आहे. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात लुडबुड करण्याचा कोणाला अधिकार नाही, हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचंही गायकवाड म्हणाल्या. दरम्यान, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे. सायबर सेलद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं आहे.