मुंबई : मुंबईकरांच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या सुटकेस मर्डर प्रकरणातील मारेकऱ्यांना गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. बांगड्याच्या कारखान्याच्या मालकासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


सात फेब्रुवारीला 12 वर्षांच्या रणधीर सहानी या चिमुरड्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी बांगड्यांच्या कारखान्याचे मालक शिवनाथ आणि त्यांच्या कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे. आरोपींनी रणधीरचा मृतदेह एका सुटकेसमध्ये बंद करुन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीनं तपास करत ती सुटकेस विकत घेणाऱ्याला हुडकून काढलं.

रणधीरचा मृतदेह लपवण्यात आलेली सुटकेस शिवनाथ यांचा मुलगा रणविजयनं विकत घेतल्याचं उघड झालं आणि या प्रकरणाचा गुंता सुटला. 12 वर्षांचा रणधीर आरोपींच्या कारखान्यात कामाला होता. सुट्टीवरून झालेल्या वादात रणधीरची गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.