मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चर्चेत आहे. भागवत यांचं नाव हिंदुराष्ट्र या संकल्पनेसाठी उत्तम पर्याय असू शकतो, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मात्र, याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असेही राऊत यांनी सांगितले.
"राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यापूर्वी दोनवेळा शिवसेना पक्षप्रमुखांनी देशहितासाठी प्रवाहापासून उलट भूमिका घेतली होती." असे सांगताना राऊत पुढे म्हणाले, "राष्ट्रपती सक्षम असावा, घटनेचं ज्ञान असावं आणि प्रखर राष्ट्रवादी असावा."
आमच्या मतांची गरज असली तर चर्चा करायला उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर असतात. चर्चेला तयार आहोत. 'मातोश्री'तही उत्तम जेवण मिळतं. मात्र, स्नेहभोजनाच्या निमंत्रणाचं कार्ड आमच्यापर्यंत आलेलं नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून स्नेहभोजनाच्या निमंत्रणाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच आहे. माझ्या माहितीनुसार शिवसेनेलाच काय, तर एनडीएच्या कुठल्याच घटक पक्षाला निमंत्रण प्राप्त झालेले नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.