मुंबई : मुंबईतील विलेपार्ले इथल्या मिठीबाई कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील पाच विद्यार्थ्यांना कुपर हॉस्पिटलमध्ये उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. तर तीन विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.


मिठीबाई कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक कार्यक्रम घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कॉलेजमध्ये कलोझियम हा मॅनेजमेंट फेस्टिवल सुरु होता. ज्यात काल रात्री एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डिवाईन रॅपरला बोलवण्यात आलं होतं. आपण फरफॉर्म करणार आहोत, अशी पब्लिसिटी त्याने केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची गर्दी वाढली. परंतु ते विद्यार्थी नव्हते, त्यांनी गेटवर गर्दी केली होती. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखलं. यावेळी झालेल्या गोंधळात काही विद्यार्थ्यांना इजा झाली. त्यापैकी तीन जण कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

जशोदा रंगमंचची क्षमता 4000 आहे आणि पासेस 4500 छापले होते. नेहमी जेवढे पासेस जातात त्यापैकी 60 ते 70 टक्केच विद्यार्थी येतात, असं कॉलेज प्रशासनाने सांगितलं.

परिणामी याचं रुपांतर चेंगराचेंगरी मध्ये झालं, ज्यात आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यातील पाच जणांना उपचार करुन सोडण्यातं आल तर तीन जणांवर उपचार सुरु आहेत. मिठीबाई कॉलेजचा प्रोग्रॅम सुरु असताना बाहेरील विद्यार्थ्यांना परवानगी कशी देण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत.