मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन पार पडले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले असून मेटे यांनी पुजारी आणि काही मोजक्या समर्थकांना घेऊन गुपचुप भूमिपूजन केल्याची माहिती आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वीच शिवस्मारकाचं अरबी समुद्रात जलपूजन केलं होतं. त्यानंतर कोणालाही फारशी कल्पना न देता शिवस्मारकाचं गुपचूप अंधारात भूमिपूजन करण्यात आलं आहे. विनायक मेटे यांनी हे भूमिपूजन का केलं? याचं कारण तेच सांगू शकतात मात्र अंधारात भूमिपूजन करणे योग्य नाही असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे.

बोट अपघाताची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसतांना पुन्हा भूमिपूजनाची घाई का केली? असा सवाल केला जात आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका स्मारकाचं भूमिपूजन कितीदा करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याआधीही असा प्रयत्न झाला होता ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला होता याचीही आठवण नवाब मलिक यांनी करून दिली. दरम्यान आपण घरातही सामानाचं पूजन करतो. आता तर इतकं मोठं स्मारक बांधतोय म्हणून मशिनरीची पूजा करायला गेलो होतो, असे मेटे यांनी म्हटले आहे. काही लोकांचा विषारी दृष्टिकोन आहे. त्यामुळे ते चुकीचा विचार करतात, ज्यांना शिवरायांबद्दल आस्था नाही ते असे आरोप करतात, असेही मेटे म्हणाले.

24 ऑक्टोबरला विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या पूजनाचा कार्यक्रम निश्चित केला होता. मात्र यावेळी समुद्रात बोट धडकली आणि सिद्धेश पवार या तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातातून 25 जणांना वाचवलं गेलं मात्र सिद्धेशचा मृत्यू झाला.  असे असताना मेटे यांनी पुन्हा एकदा लपतछपत जाऊन शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्याचा प्रकार समोर आला आहे.