मुंबई : तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परळ स्थानकाच्या नव्या फलाटासाठी मध्य रेल्वेवर आठ तासांचा, तर हार्बर मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री 12 वाजून 45 मिनिटे ते सहा वाजून 25 मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉकचा फटका मेल-एक्स्प्रेसलाही बसेल. शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहे.

परळ स्थानकात नव्या फलाटांसाठी रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटे ते पाच वाजून 30 मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेऱ्या सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान 11 वाजून 34 मिनिटे ते दुपारी चार वाजून 47 मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. चुनाभट्टी /वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक 11 वाजून 10 मिनिटे ते चार वाजून 10 मिनिटांपर्यंत बंद असेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल, कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट, पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी दहा वाजून 35 मिनिटे ते दुपारी तीन वाजून 35 मिनिटांपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या काळात धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

कोणत्या डाऊन लोकल रद्द?

शनिवार

सीएसएमटी-कल्याण रात्री 9 वाजून 54 मिनिटे
सीएसएमटी-अंबरनाथ रात्री 11 वाजून 52 मिनिटे

रविवार

विद्याविहार-टिटवाळा पहाटे 5 वाजून 12 मिनिटे
सीएसएमटी-अंबरनाथ पहाटे 5 वाजून 40 मिनिटे
विद्याविहार-कल्याण पहाटे 6 वाजून 37 मिनिटे

कोणत्या अप लोकल रद्द?

शनिवार

कल्याण-सीएसएमटी रात्री 11 वाजून 5 मिनिटे

रविवार

कल्याण-सीएसएमटी पहाटे 4 वाजून 41 मिनिटे , 6 वाजून 4 मिनिटे, 6 वाजून 15 मिनिटे
अंबरनाथ-सीएसएमटी पहाटे 3 वाजून 45 मिनिटे, 4 वाजून 11 मिनिटे
टिटवाळा-सीएसएमटी पहाटे 4 वाजून 1 मिनिटे

कोणत्या एक्स्प्रेस रद्द?

शनिवार - पुण्याहून मुंबईकडे येणारी इंद्रायणी एक्स्प्रेस
शनिवार - भुसावळहून मुंबईकडे येणारी भुसावळ पॅसेंजर
रविवार - मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस
रविवार - मुंबईहून भुसावळकडे जाणारी भुसावळ पॅसेंजर