हर्षद हा बदलापूरच्या पूर्व भागातील गांधी चौकात राहणारा होता. 7 जून रोजी हर्षद त्याच्या 11 जणांच्या टीमसोबत उत्तराखंडला ट्रेकिंगसाठी गेला होता, ज्यात चार जण बदलापूरचे, तर इतर 7 जण उर्वरित महाराष्ट्रातले होते. दोन परदेशी ट्रेकर्सही या ट्रेकमध्ये त्यांच्यासोबत होते.
9 जूनला या सगळ्यांनी ट्रेकिंगची सुरुवात केली. 15 जून रोजी ते ट्रेक संपवून बेस कॅम्पकडे परतत होते. मात्र वाटेतला शेवटचा टप्पा असलेल्या बारा सुपा भागात आल्यावर अचानक हर्षदला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास यामुळे अत्यवस्थ झालेल्या हर्षदला तातडीने खाली आणण्यात आलं, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच हर्षदचे कुटुंबीय शुक्रवारी बदलापूरहून उत्तराखंडसाठी रवाना झाले असून ते उद्या उत्तराखंडला पोहोचतील. 33 वर्षांचा हर्षद विवाहित असून त्याला 5 वर्षांची मुलगीही आहे. या अकस्मात घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.