मुंबई : लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा नाही असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयानं एका आरोपीला पोक्सोतून दोषमुक्त केलं. मात्र याच प्रकरणात मुलीच्या आईचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या 28 वर्षीय आरोपीचं वय आणि पहिलाच गुन्हा असल्यानं त्याला सुधारण्याची संधी देत असल्याचं यावेळी कोर्टानं स्पष्ट केलं. साल 2017 मध्ये ही घटना मुंबईत घडली होती. दुपारच्यावेळी घरात इलेक्ट्रिशियनचं काम करण्यासाठी आलेल्या इसमानं अतिप्रसंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला होता.


काय होती घटना -


साल 2017 मध्ये एका उच्चभ्रू इमारतीत 33 वर्षीय महिलेच्या घरातील फ्रिज बिघडला होता. म्हणून तिनं वॉचमनला सांगून इमारतीच्या इलेक्ट्रिशियनला घरी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार हा आरोपी इलेक्ट्रिशियन घरी आला. फ्रिजचा पार्ट बदलावा असं सांगून थोड्यावेळानं तो पुन्हा आला. त्यावेळी महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत घरात एकटीच होती. अचानक या इसमानं एका लहान मुलीच्या गालाला स्पर्श केला. त्यावर महिलेनं त्याला हटकलं आणि दम दिला. त्यानंतर घरातील वॉशिंग मशिनही खराब असल्यानं तिही चेक करण्यास सांगितलं. तेव्हा तो इलेक्ट्रिशियन आत गेला.


'पत्नीकडे पैशांची मागणी करणे ही छळवणूक नव्हे', नागपूर खंडपीठाचा आणखी एक धक्कादायक निकाल


त्यानंतर अचानक पाठीमागून येऊन त्यानं महिलेला मिठी मारली. यावर ती महिला चटकन मागे झाली, तिनं इलेक्ट्रिशियनचे पैसे दिले आणि त्याला घरातून बाहेर काढलं. जाता जाता पुन्हा या आरोपीनं लहान मुलीच्या गालाला स्पर्श केला. महिलेनं तातडीनं आपल्या घरच्यांना आणि इमारतीच्या व्यवस्थापकांना याची तक्रार दिली. त्यानंतर रितसर पोलीस तक्रार देत या आरोपीला अटक करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर महिलेचा विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.


'पॉक्सो'बाबत अभूतपूर्व निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना झटका, हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे


कोर्टातील खटल्यात काय झालं -


घटना घडली तेव्हा ती मुलगी चार वर्षांची होती. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान तिचीही साक्ष नोंदवण्यात आली. मात्र या सात वर्षीय मुलीनं आपल्याला काहीही आठवत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे महिलेच्या जबानीवरून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं आरोपीला वियनभंगासाठी दोषी ठरवलं. आरोपीचं वय आणि पहिलाच गुन्हा असल्यानं त्याला याप्रकरणी एक वर्षाची कमीतकमी शिक्षा आणि 10 हजारांचा दंड देत सुधारण्याची संधी दिली आहे. तसेच लहान मुलीच्या गालाला स्पर्श करताना त्याचा लैंगिक शोषणाचा हेतू सिद्ध न झाल्यानं त्याला पोक्सोतून दोषमुक्त करण्यात आलं.


पॅन्टची झीप उघडी ठेवणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही.. नागपूर खंडपीठाच्या निर्णयावरुन विधी क्षेत्रात मतमतांतरे