मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) साल 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर 'सामना' कार्यालयासमोर घेतलेली सभा शिवसैनिकांनी उधळवून लावली होती. याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं शिवसेना नेते अरविंद सावंत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह 28 शिवसैनिकांना पुराव्यांअभावी निर्दोषमुक्त करत मोठा दिलासा दिला आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असून आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्यानं सर्वांची निर्दोष मुक्तता केली.


राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरचा प्रसंग


अंतर्गत मतभेदामुळे नारायण राणेंनी 18 वर्षांपूर्वी शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते. 


शिवसैनिकांचा सभा उधळून लावण्याचा प्रयत्न


शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला होता. त्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. या प्रकरणी  शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई , विनायक राऊत, अनिल परब, सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, यांच्यासह एकूण 47 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


निर्दोष मुक्त झालेले शिवसैनिक


अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, अजय चौधरी, दगडू सकपाळ, किरण पावसकर, सूर्यकांत महाडिक, श्रद्धा जाधव, हरीश वरळीकर, रवींद्र वायकर, विशाखा राऊत, सुहास पाटील, विनायक देवरुखकर, सदानंद परब, सूर्यकांत बिर्जे, अशोक केळकर, मनोहर सावंत, प्रवीण शेट्ये, मनोहर कांबळी, महेश सावंत, ज्योती भोसले, स्वाती शिंदे, इंदुमती माणगावकर, अजित कदम, स्नेहल जाधव, प्रिती देव्हारे, मंगेश भाटकर, प्रकाश पवार या 28 शिवसैनिकांना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. तर शिवसेना नेते दत्तात्रय नलावडे यांचं खटला प्रलंबित असताना निधन झाल्यानं त्याचं नाव या खटल्यातून वगळण्यात आलं होतं.


ही बातमी वाचा: