मुंबई : एमडी आणि एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात सायन रुग्णालयाच्या सहाय्यक अधिष्ठात्यालाही अटक करण्यात आली आहे. तर अशाच आणखी एका प्रकरणात ज्यामध्ये एक टोळी मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळवून देते असं सांगून लोकांकडून लाखो रुपये लुटायची त्या टोळीलाही पोलिसांनी गजाआड केलं आहे.


डॉक्टर हे देवाचं दुसरं रुप मानलं जातं. पण पैसे घेऊन मेडिकलमध्ये प्रवेश देण्याचं एक रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. परराज्यातून आणि बाहेरगावावरुन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याचा तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. सायन पोलीस ठाण्यात दाखल दोन वेगवेगळ्या प्रकरणात सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एमडीसाठी 50 लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणात सायन रुग्णालयाच्या सहाय्यक अधिष्ठात्यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.


डॉ. राकेश वर्मा हा सायन रुग्णालयाचा सहायक अधिष्ठाता आहे. एमडी विभागात शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्याने एका विद्यार्थ्याकडून जवळपास 50 लाख रुपये घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. सायन पोलीस ठाण्यात त्याच्यावर फसवणूक आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा नावाखाली अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झालं आहे.


एका दुसऱ्या प्रकरणात पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे. एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या प्रकरणात ही अटक झाली आहे. हिमांशू सुकला, निखील श्रीवास्तव, सतीश सेन आणि डॉ. कौशिक मेहता अशी अटक झालेल्यांची नावं आहे. त्यांच्याकडून विविध रुग्णालयांची बनावट ओळखपत्र त्याचबरोबर सिम कार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आली आहेत. क्रिकेटमध्ये ज्या मुलांची फसवणूक झालेली आहे अशा मुलांच्या नावांची यादी सुद्धा आरोपींकडून मिळाली आहे. सायन पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.



या दोन्ही पर्दाफाश डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण (अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रदेश विभाग), विजय पाटील (पोलीस उपायुक्त परिमंडळ 4), बी एस इंदलकर (सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग), ललिता गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायन पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पोपळघाट, दिलीप घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक निकीता नारणे, जाधव, गायकर, नाईकवाडी आणि पाटील या पथकाद्वारे करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.