मुंबई : शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्री आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जिल्हा प्रमुखांनी शिवसेना मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवल्यानंतर प्रमुख नेते भडकले.

गुलाबराव पाटील, रामदास कदम यांनी जिल्हाप्रमुखांना चांगलंच फैलावर घेतलं. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं भाषण सुरु असताना आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी आक्षेप घेतल्यामुळे रावतेंना भाषण आटोपतं घ्याव लागलं.

शिवसेना पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत, कुठलाच अंतर्गत वाद नाही, असं म्हणत शिवसेनेतील धुसफूशीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे. तसंच भाजपच्या मिशन 2019 च्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काही हेवेदावे असतील तर ते विसरुन रस्त्यावर उतरुन कामाला लागा असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

शिवसेना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्री विरुद्ध जिल्हाप्रमुखांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मौन सोडत पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेत कुठलेच मतभेद नाही, कुठलाच अंतर्गत वाद नाही, तुम्ही जे रंगवलं त्याच्यावर कालच पडदा पडला, असं सांगत हाजी अराफत शेख यांच्या स्फोटक आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.