Narendra Modi : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी 18 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका ठाणे आणि त्यापल्ल्याडील वाहतूकीसाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांत आठड्याच्या शेवटाला मेगाब्लॉक घेत या मार्गिकाच्या निर्माणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्या आहेत.
पतंप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ठाणे आणि दिवा या स्थानकांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ते उपस्थिताना संबोधितही करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्रित येवून पुढे मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार मार्गांपैकी दोन मार्ग धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले.
ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत. त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल आहेत. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल. तसेच या मार्गांमुळे शहरात 36 नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येतील.