मुंबई: दहीहंडी पथकात किती गोविंदा असावेत?, याचा नियम राज्य सरकारनं करायला हवा. गोविंदांच्या गर्दीवर निर्बंध नसल्यामुळेच सण उत्सवाला गर्दी होते. ज्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गोविंदा पथकात किती गोविंदा असावेत याचा पुढच्या वर्षीसाठी राज्य सरकारनं गंभीरतेनं विचार करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना हायकोर्टानं सोमवारी केली आहे.


कल्याणमध्ये एका ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. शिवसेनेच्या एका गटाला परवानगी आणि दुसऱ्याला मनाई का? असा सवाल करत हायकोर्टानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी नाकारणाऱ्या कल्याण पोलिसांना बुधवारी तातडीनं भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहेत.  


सण-उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देताना तुम्ही भेदभाव करू शकत नाही. दोन्ही गटाला परवानगी द्या, अथवा कुणालाच देऊ नका अन्यथा काही तरी मध्यम मार्ग काढा. यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं कल्याण पश्चिमेकडील महात्मा फुले पोलीस ठाण्याला देत न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती फिरदोस पुनावाला यांच्या खंडपीठानं बुधवारी यावर तातडीनं सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलं आहे.


काय आहे याचिका? 


ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन दिलीप बासरे यांनी ॲड. जयेश वाणी आणि ॲड. सिद्धी भोसले यांच्यामार्फत हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षी आम्हाला शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र यावर्षी शिंदे गटाचे शहर प्रमुख रविंद्र पाटील यांना येथे उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली. तिथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ठाकरे गटाला परवानगी नाकारली आहे, असं महात्मा फुले पोलीस ठाण्यानं स्पष्ट केलम आहे. मात्र हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे ठाकरे गटालाही तिथं उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.


उत्सवाला परवानगी नाकारू शकत नाही - हायकोर्ट


कायदा व सुव्यवस्था राखणं ही तुमची जबाबदारी आहे. वाहतूककोंडी होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचं काम तुमचं आहे. कायदा व सुव्यवस्थेची सबब देऊन तुम्ही एकाला परवानगी देत दुसऱ्याला नाकारणं अयोग्य आहे, या शब्दांत हायकोर्टानं पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. इथून जवळच असलेल्या शिवाजी महाराज चौकात जागा कमी आहे. त्यामुळे ठाकरे गटानं तिकडे उत्सवाचं आयोजन करण्याचा पर्याय दिला आहे, असा युक्तिवाद महात्मा फुले पोलिसांनी हायकोर्टात केला. मात्र एखाद्या पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखा युक्तिवाद करू नका, या शब्दांत हायकोर्टानं कल्याण पोलिसांना फटकारलं.


दोन्ही गटाला वेगवेगळी वेळ द्या. एका गटाला अमूकएक वेळ दिली तर दुसऱ्या गटाला दुसरी वेळ द्या, तसेच दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या मंडळांना कमीतकमी गोविंद सोबत आणण्याची अट घाला, म्हणजे गर्दी होणार नाही अशी सूचनाही यावेळी हायकोर्टानं केली आहे.


ही बातमी वाचा: