मुंबई: राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या स्नेहभोजनाच्या चर्चा रंगलेल्या असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शिवसेनेलाच काय तर एनडीएतील इतर कोणत्याही घटक पक्षाला स्नेह भोजनाचं निमंत्रण नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी असेल तर त्यासंदर्भातील स्नेहभोजन आणि चर्चा फक्त ‘मातोश्री’वर होईल, कारण यापूर्वीच्या 2 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याची सारी चर्चा ‘मातोश्री’वरच झाली होती. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘राष्ट्रपती सक्षम असावा, घटनेचं ज्ञान असावं आणि प्रखर राष्ट्रवादी असावा. या पूर्वी दोन निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी देश हितासाठी प्रवाहापासून उलट भूमिका घेतली होती. आमच्या मतांची गरज असली तर चर्चा करायला उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर असतात. चर्चेला तयार आहोत. ‘मातोश्री’त ही उत्तम जेवण मिळतं.’ अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंकडे प्रीती भोजनाचं निमंत्रणाचं कार्ड आलेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाची राष्ट्रपती पदासाठी चर्चा असल्याचंही म्हटलं. ‘मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. हा हिंदुराष्ट्र या संकल्पनेसाठी उत्तम पर्याय असू शकतो. मात्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील.’ असंही संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण