राज ठाकरेंकडून परप्रांतियांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2017 08:26 AM (IST)
राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लागेबांधे असल्याचा घणाघातही संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्यॅक केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा तीळपापड झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लागेबांधे असल्याचा घणाघातही निरुपम यांनी केला आहे. संजय निरुपम काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी खुलेआमपणे धमकी दिली. कायदा, मुख्यमंत्री यांना खुलं आवाहन दिलं. मात्र मुख्यमंत्री बांगड्या भरुन बसले आहेत. त्यांनी 15 दिवसांत कोणतीही कारवाई केली नाही, असं निरुपम म्हणाले.