मुंबई : मुंबईत हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.


मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली ते नायगाव स्टेशनदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येईल. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अप फास्ट मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल सुमारे 20 मिनिटं उशिराने धावतील.

डाऊन फास्ट मार्गावर सीएसएमटीहून सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या कालावधीत लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावर थांबतील. ब्लॉक काळात अप आणि डाऊन दिशेकडील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसलाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे. सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत मेल-एक्स्प्रेस धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकामध्ये सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सर्व अप आणि डाऊन जलद लोकल विरार-वसई ते बोरीवलीपर्यंत अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवाहून सुटणार

ब्लॉक काळात रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दिवा स्थानकात अंतिम थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे परतीचा प्रवासही दिव्याहूनच सुरु होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे दादर स्थानकातून ठाण्यासाठी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी आणि ठाण्याहून दुपारी 4 वाजून 6 मिनिटांनी विशेष लोकल सोडण्यात येतील.