फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2017 11:44 PM (IST)
कल्याण आणि डोंबिवली शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह 8 ते 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा करण्यात आला आहे. फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली.