मुंबईत राष्ट्रवादी आणि यशवंत सेनेमध्ये तुफान हाणामारी
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 09:42 AM (IST)
मुंबई : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशवंत सेनेमध्ये आज तुफान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन सुरु असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकार्त्यांमध्ये हाणामारी झाली. धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आम्ही नक्षलवादी होऊ असं वक्तव्य मधुकर पिचड यांनी केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी आज यशवंत सेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर जाऊन जोडेमारो आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते आणि यशवंत सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. सुरुवातीला सुरु झालेल्या शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला. यशवंत सेनेचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले गुंड आहेत. हे सगळे ठरवून केलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी राडा सुरु असताना 45 मिनिटं इथे एकही पोलिस आला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. तसंच यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांकडे हत्यारं होती, असा दावाही मलिक यांनी केला. पाहा व्हिडीओ