मुंबई: मुंबईत काल दुपारी दोनपासून सुरु झालेला पाऊस अजिबात थांबलेला नाही. पावसाने आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे.
मुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. अद्यापही हे पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळतेय.
तर एअर इंडियानं सकाळी 7 वाजेपर्यंतच्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.
एक्स्प्रेस रद्द
याशिवाय मनमाड येथून सुटणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस ही गाडी मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे येत्या 24 तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबईतील शाळा बंद
जोरदार पावसामुळं आज मुंबई आणि उपनगरातल्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली. हवामान विभागानं येत्या २४ तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं शिक्षण विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
विमान सेवा विस्कळीत
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळं एकूण 74 विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावरून भारतातल्या इतर ठिकाणी उड्डाण घेणाऱ्या दुपारी 12 वाजपर्यंतच्या 34 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 14 फ्लाईट्स उशिरानं आहेत.
मुंबईवरून दिल्लील्ला जाणाऱ्या 5 विमान उड्डाण रद्द झाल्यात तर 4 फ्लाईट्स उशिरा आहेत.. मुंबई-बगळुरु, मुंबई-अहमदाबाद आणि चेन्नईसाठी उड्डाण घेणाऱ्या फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबईतून परदेशात उड्डाण घेणाऱ्या 19 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.
तर एअर इंडियाची सकाळी 7 वाजेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
कोकणात मुसळधार
तिकडे कोकण किनारपट्टीवरही जोरदार पावसानं हजेरी लावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आलं होतं. त्यामुळे माणगाव खोर्यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही या पाण्यामुळे खोळंबून राहावं लागलं. तर तिकडं रत्नागिरी आणि रायगडला जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे.
सोसाट्यचा वारा आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.
दापोलीतील पाजच्या समुद्र किनारी काही बोटी देखील बुडाल्या. या दुर्घटनेत 7 खलाशांना वाचवण्यात आलं. तर तीन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
पुण्यातही जोरदार पाऊस
तिकडे पुण्यातही काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या जोरामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.
कोल्हापुरात मुसळधार
कोकणापाठोपाठ कोल्हापुरातही तुफान पाऊस पडला. राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले असून 12 हजार क्सुसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 4 तासात काल राधानगरी धरणक्षेत्रात 80 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
साताराऱ्या धुवांधार
तर तिकडे साताऱा जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस बरसला... महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात जोरदार पाऊस झाला.
कोयना धरणात झपाट्यानं पाण्याची वाढ झाली. कालच्या पावसामुळं दीड टीएमसीनं पाणीसाठा वाढलाय. सध्या कोयनेत 91 टीएमसी पाणीसाठा आहे.