मुंबई : मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या 16 कंत्राटदारांनी मिळून मुंबईकरांना तब्बल 572 कोटींना लुबाडल्याची माहिती आता समोर येत आहे. या घोटाळ्याची पाळंमुळं खणण्यासाठी मुंबई महापालिकेनं नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीनं हा दावा केला आहे.

मुंबई महापालिका आता या कंत्राटदारांची बिलं थकवणार असून त्या 16 कंत्राटदारांना दिलेले आगाऊ पैसेही वसूल करणार असल्याची माहिती मिळत आहे. या 16 कंत्राटदारांपैकी 6 कंत्राटदारांविरोधात आधीच तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नमुन्यादाखल पाच रस्त्यांच्या पाहाणीनंतर ते सदोष असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर 217 रस्त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. कंत्राटदारांनी या कामामध्ये गुणवत्तेचे निकष न पाळत, रोडची जाडी, साईड पट्ट्यांची रुंदीबाबत हयगय केल्याचा अहवाल 10 महिन्यांच्या तपासणीनंतर काढण्यात आला आहे.