मुंबई: मुंबईतल्या खड्ड्यांना आता ‘मिडास’ टच दिला जात आहे. मिडास टचमुळे एखादा खड्डा हा अवघ्या काही मिनिटात दुरुस्त होतो. मात्र, या पद्धतीद्वारे एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 10 ते 15 हजारांचा खर्च येत आहे.


थेट ऑस्ट्रियाहून आणलेल्या या मिडास पद्धतीत ग्रेनाईट आणि अस्फॉल्ट यांच्या रासायनिक प्रकियेचं मिश्रण असतं. खड्ड्यांवर थोडसं पाणी टाकून त्यात हे मिश्रण टाकलं तरी हा खड्डा बुजवला जातो. मात्र, एवढ्या खर्चिक पद्धतीनंतर हे खड्डे पूर्ववत तर होणार नाहीत ना? याचं उत्तर येणारा काळच देणार आहे.

१४ किलोच्या मिश्रणाच्या एका पाकिटाची किंमत २००० रुपये आहे. ३ ते ५ इंचाचा लहानसा खड्डा भरण्यासाठीही अशी ६ ते ७ पाकीटं लागतात. त्या हिशेबानं एका खड्ड्यापाठीमागे तब्बल १२ ते १५ हजार सहज खर्च होतात.

मुंबईतले सगळेच खड्डे या पद्धतीनं भरायचे म्हटले तर कोट्यवधी पैसे खर्च होतील. आतापर्यंत मुंबईत शिवसेना भवन समोर, महापालिका मुख्यालयासमोर तर सगळ्यात जास्त मालाड ते बोरिवली दरम्यान एस.व्ही रोड वरचे एकूण ४० खड्डे याच तंत्रज्ञानानं भरले गेले आहेत. यासाठी इकोग्रीन इन्फ्रासट्रक्चर अँन्ड डेव्हलपमेंट प्रा.लि. या कंपनीला ३० लाखांचं कंत्राट देण्यात आलं आहे.

अवाढव्य खर्चामुळे मोजकेच खड्डे भरले जात आहेत. त्यातल्या त्यात महत्वाच्या ठिकाणी असलेल्याच खड्ड्यांचा नंबर लागत असल्यानं पालिकेकडून निवडले जाणारे खड्डेही व्हीआयपी झाले आहेत.

खरं, तर एका खड्ड्यामागे काही हजारो रुपये ही किंमत एखाद्याच्य जीवापेक्षा नक्कीच कमी आहे. मात्र, मुंबईतल्या रस्त्यांना दिला जाणारा हा मिडास टच कायमस्वरुपी रहावा हिच मुंबईकरांची इच्छा आहे.

VIDEO: