Mumbai Rape News Update : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ल्यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. HDIL कंपाउंडमधल्या बंद इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. काही तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी इमारतीत गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला.. तरुणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आढळून आल्या आहेत. आता तरुणीची हत्या करणाऱ्यांचा शोध लावण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.






चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप


या घटनेची माहिती कळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन म्हटलं आहे की,  कुर्ला येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे ही घटना धक्कादायक आहे. राज्य सरकारने साकीनाका प्रकरण झाल्यानंतर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं होतं. मुंबई पोलिसांनी अकरा कलमी कार्यक्रम आहे जाहीर केला होता, त्याचं काय झालं? निर्जन ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी, लाइटची व्यवस्था करावी अशा सूचना केल्या होत्या मग तरीही कुर्ल्यामध्ये महिलेवर अत्याचार कसा होतो? भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल महाविकास आघाडी सरकारला महिलांच्या सुरक्षेपेक्षा नाईट लाईटची जास्त काळजी आहे. मुंबईतल्या खड्ड्यांप्रमाणे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही खड्ड्यात गेली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.