मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात जाऊन कलिनातील पक्षाचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी गंभीर जखमी असलेल्या संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


कलीनातील वॉर्ड क्रमांक 166 मधील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवाराने प्राणघातक हल्ल्याचा आरोप आहे. भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्यासह भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी तुरडेंवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले आहेत. संजय तुरडे यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हल्ल्यानंतर संजय तुरडे यांच्या पत्नीने 'कृष्णकुंज'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती.