मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 87,719 मतदारांना 'नन ऑफ द अबाव्ह' अर्थात 'नोटा'चा (NOTA) वापर केला. राज्य निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी ईव्हीएमवर पहिल्यांदाच 'नोटा'चा पर्याय उपलब्ध करुन दिला.
मुंबईतील वांद्रे पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 91 मध्ये सर्वाधिक 1135 मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे. या वॉर्डमधून शिवसेनेच्या शगून नाईक यांचा विजय झाला आहे. त्याखालोखाल दक्षिण मध्य मुंबईतील वॉर्ड क्रमांक 198 मध्ये 964 मतदारांनी 'नोटा' या पर्यायाचा उपयोग केला. या वॉर्डमधून विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर विजयी झाल्या आहेत.
तर 'नोटा'चा सर्वात कमी वापर मानखुर्दमधील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये झाला. 134 मतदारांनी 'नोटा'चा वापर करुन कोणत्याही उमेदवाराच्या पारड्यात मत दिलं नाही. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार शायरा खान यांचा विजय झाला.
ईव्हीएमवर सर्व पक्षांच्या उमेदवारांसह 'नोटा' हा पर्याय उपलब्ध असतो. वरील उमेदवारांपैकी एकही उमेदवार वॉर्डमधील समस्या सोडवू शकत नाही, असं वाटल्यास मतदार 'नोटा'चा वापर करुन त्यांना नाकारु शकतात.
'नोटा' पर्यायाविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी 'फ्री अ बिलियन' या सामाजिक संस्थेने मोहीम राबवली होती. "मतदारांनी 'नोटा'चा वापर केल्याने आम्ही आनंदी आहोत. यामुळे मुंबई महापालिकेतील कामात बदल होईल," असं संस्थेच्या ग्रुप मॅनेजर सुचिता देशपांडे म्हणाल्या.
दुसरीकडे ठाणे महापालिकेतही 81, 888 मतदारांनी 'नोटा'चा वापर केल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.