मुंबई: राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी परतीचा जोरदार पाऊस झाला. मुंबईत परतीच्या पावसाने (Mumbai Rains) कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना अक्षरश: झोडपून काढले. मुंबईत बुधवारी दिवसभरात 170 मिमी पाऊस झाला. काल सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु होती. मात्र, संध्याकाळच्या वेळेस पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी मुंबईतील रस्ते वाहतूक आणि लोकल ट्रेनची सेवा कोलमडून पडली. यादरम्यान, अंधेरीच्या सिप्झ (Andheri Seepz) परिसरात एका महिलेचा ड्रेनेज लाईनमध्ये पडून मृत्यू झाला. या महिलेचे नाव विमल आप्पाशा गायकवाड असे आहे.


विमल गायकवाड या बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सिप्झ परिसरातील कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.  त्यावेळी जोरदार पाऊस सुरु होता. विमल गायकवाड (Vimal Gaikwad) या पवईच्या मिलिंद नगरमध्ये वास्तव्याला होत्या. सिप्झच्या गेट क्रमांक 3 च्या परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. सिप्झ परिसरात अलीकडेच मेट्रो-3 मार्गावरील भुयारी स्थानक उभारण्यात आले आहे. एमएमआरडीएकडून या स्थानकाचे काम करण्यात आले होते. यावेळी येथील रस्त्यावरील एका ड्रेनेज लाईन उघडण्यात आली होती. स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने ड्रेनेज लाईनवर झाकण टाकून ती बंद केली नाही. त्यामुळे विमल गायकवाड चालताना ड्रेनेजमध्ये पडल्या. त्या ड्रेनेजमध्ये पडल्यानंतर वाहत गेल्या, त्यांना सावरण्यासाठी उसंतही मिळाली नाही. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. 


अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले. मात्र, या सगळ्यात तासभराचा वेळ निघून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेजमध्ये शोधाशोध केल्यानंतर साधारण 90 मीटर अंतरावर विमल गायकवाड यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले होते. त्यांना तातडीने कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  


पाणी साचले असताना रस्त्यावर पालिकेचे कर्मचारी मदतीला नव्हते: आदित्य ठाकरे


कालच्या पावसात मुंबई, ठाणे आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झाले. पहिल्यांदाच काल पश्चिम द्रुतगती महामार्गावर 2005 नंतर पाणी भरल्याचे दिसले. नागरिकांना मदत करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या टीम कुठे दिसल्याच नाहीत. मुख्यमंत्री मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करणार होते. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.


आणखी वाचा


मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप