Mumbai News : मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये काल मुसळधार पावसाने (Mumbai Rains) झोडपून काढलं. तर राज्यातील इतर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 24 तासात 1.68 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता. तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा आता 8.94 टक्के झाला आहे


धरणातील पाणीसाठा 2.04 टक्क्यांनी वाढला 


मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे सात धरण आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील 24 तासात 12.57 टक्के इतका होता. त्यात वाढ होऊन आता हाच पाणीसाठा 14.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच धरणातील एकूण पाणीसाठा जवळपास 2.04 टक्क्यांनी वाढला आहे


कोणत्या धरणात मागील 24 तास किती टक्के पाणीसाठा वाढला?


अप्पर वैतरणा - 00 टक्के


मोडक सागर - 3.1 टक्के


तानसा - 3.11 टक्के


मध्य वैतरणा- 2.65 टक्के


भातसा - 1.02 टक्के


विहार - 4.61 टक्के


तुळसी -7.18 टक्के


यामध्ये तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील 24 तासात सर्वाधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.




मुंबईसह उपनगरात पावसाची दाणादाण


दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसाने दिवसभर दाणादाण उडवल्याचं चित्र पाहायला मिळालं. सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी तुंबले होते. काही भागांतील रस्तेही जलमय झाले. तर नाले, गटारेही तुंबली. मुंबईतील शहरी भागांपेक्षा उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. मुंबईत सहा ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या.


मागील 24 तासातील पावसाची आकडेवारी


कुलाबा -  148 मिमी 
सांताक्रुज - 121.6 मिमी 
नवी मुंबई - 196.2 मिमी


मुंबईत 1 जुलैपासून 10 टक्के पाणी कपात


दरम्यान, मुंबई महापालिकेने एक जुलैपासून दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतलेला असताना धरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीने धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन पाणी कपातीच्या या निर्णयासंदर्भात फेरविचार करु शकते. मात्र सध्या तरी एक जुलैपासून मुंबईमध्ये पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे.


ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद 


दुसरीकडे ठाण्यात काल सकाळी 8.30 पासून ते आज सकाळी 8.30 पर्यंत म्हणजे गेल्या 24 तासात तब्बल 200.08 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक 89.91 मिमी पाऊस काल दुपारी 12.30 ते 2.30 या दोन तासात कोसळला.यावर्षी आतापर्यंत एकूण 506.46 मिमी पावसाची नोंद झाली. तर मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेतल्याने आज दैनंदिन व्यवहार सुरळीत आहेत.


हेही वाचा


Mumbai Rains: मुंबई, ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू