Maharashtra Mumbai News: मुंबईच्या (Mumbai News) भायखळ्यात (Byculla) एका घरावर झाड कोसळलं. यावेळी घरात झोपलेल्या 5-6 जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबईत पावसाळा सुरू झाल्यापासून झाड पडल्यामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. काल (बुधवारी) पश्चिम उपनगरांत झाड पडून दोघांचा मृत्यू झाला आणि रात्री भायखळ्यात झाड पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. 


मुंबईच्या भायखळ्यामध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाड खाली पडल्यामुळे एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्री भायखळा इंदू ऑईल मिल कंपाऊंडमध्ये घरात पाच ते सहा जण झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास एक झाड खाली घरावर पडल्यामुळे रहमान खान (वय 22 वर्ष) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच्या घरातील तरुण रिजवान खान (वय 20 वर्ष) गंभीर जखमी झाला आहे. सध्या रिजवान खानवर भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


मालाड परिसरात झाड पडल्याने एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 


मुंबईतील मुसळधार पावसात झाड कोसळल्यामुळे आतापर्यंत तीन जणांचा जीव गेला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कौशल महेंद्र जोशी वय वर्ष 38 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी, चाळीतील शौचालयात गेला असता हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.


मुसळधार पावसामुळे ठाण्यात झाड कोसळलं


मुंबईसह ठाणे शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यात ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. ठाण्यातील राम मारुती रोड या ठिकाणी असलेल भल मोठ झाड कोसळून रस्त्यावर पडल. त्यामुळे काही काळ या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेत त्या ठिकाणी असलेल्या पुना गाडगीळ या ज्वेलर्सच्या दुकानाचं किरकोळ नुकसान झालं आहे. तसेच ज्या फुटपाथवर हे मोठं झाड होतं, ते पडल्यानं संपूर्ण फुटपाथ उखडलेला आहे. महापालिका आपत्ती विभाग आणि अग्निशमन दलाकडून पडलेलं झाड बाजूला करण्यात आलं.